सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

चुकलेल्या जगात !


परत मी चुकलेल्या जगात आलो आहे

जुळणारे येथे कोणतेच रंग नाही
जमणारे येथे कोणतेच सूर नाही
पाण्याचेही 'तत्व ' येथे खोटे आहे
सत्याचेही  'सत्व ' येथे खोटे आहे
 परत मी चुकलेल्या जगात आलो आहे

भुकेले येथे म्हातारेच फार आहेत
तरुण आपली अब्रू सांभाळून आहेत
डोळ्यादेखत 'बुजुर्ग ' पागल आहेत
तरुण आपली भवितव्य हरवून आहे
परत मी चुकलेल्या जगात आलो आहे

सकाळची वेळही अजून झाली नाही
आणि सूर्य अस्तास लागला आहे
चिमण्यांची किलबिलही उठली नाही
आणि पुन्हा त्या घराला लागल्या आहेत
परत मी चुकलेल्या जगात आलो आहे

गुहेतली घुबडे मला हवी आहेत
वटवाघळांची संगत मला हवी आहे
गिधाडांचे थवे मला हवे आहेत
पण , हा  'माणूस ' मला नको आहे
परत मी चुकलेल्या जगात आलो आहे


कुणीतरी जवळचे हवे

कुणीतरी जवळचे हवे
रडतांना हसवण्यासाठी , रुसल्यावर फुलवण्यासाठी
कुठेतरी काहीतरी हरवल्यावर शोधून देण्यासाठी
जीवनाच्या ग्रीष्मात , वसंत बहरवण्यासाठी
कुणीतरी जवळचे हवे ........

दुःखाची वाटेकरी होऊन हवी सोबतीला
जीवन प्रवासात गुजगोष्टींसाठी हवी बरोबरीला
श्रमल्यावर प्रेमाचा हात असावा परिहाराला
हसून नवजीवन निर्माण करावयाला
कुणीतरी जवळचे हवे .........

दुर्गंधात सुवासाचे सिंचन करणारी
सुकलेल्या ओठांवर अमृत ओतणारी
जगाच्या यातना विसरून जाव्यात
इतके अमृत घट संसारी भरणारी
कुणीतरी जवळचे हवे

 हे नयन वेडे , उगीच शोधीत फिरतात
आणि मनाला उगीच आशा लावतात
ओठांमधून उगीच शब्द थरथरतात
कुणीतरी जवळचे हवे
कुणीतरी जवळचे हवे

तुमच्या कळपात

तुमच्या कळपात मी कसा आलो
हे मला कधी कळलेच नाही

मात्र कळायला लागले तेव्हा
फार उशीर झालेला होता

प्रत्येक वेळी होणारी विटंबना
पदोपदी केली जाणारी अवहेलना
निमूटपणे सहन करूनसुद्धा
तुम्ही मला कधी आपले मानलेच नाही
तुमच्या कळपात मी कसा आलो
हे मला कधी कळलेच नाही

तुमच्या कळपाचे नियम सांभाळणे
माझ्या रक्तातच नव्हते
आगळा वेगळा माझा स्वभाव
त्यामुळे आपले कधी जमतच नव्हते
म्हणून तुमच्या दारात मला कधी
तुम्ही उभे केलेच नाही
तुमच्या कळपात मी कसा आलो
हे मला कधी कळलेच नाही

आता हे कळपातले जीवन
असे किती दिवस काढायचे ?
माझ्यातला मी विसरून
असे कुठवर जगायचे ?
झालेल्या चुकीचे असे कुठवर भोगायचे ?
हे मला अजून उमगलेच नाही ......
तुमच्या कळपात मी कसा आलो
हे मला कधी कळलेच नाही 

आभाळ पेलण्यास गेलो

 नव्हते मजपाशी काही ,
              तरी तुम्हांस देण्यास गेलो
ओंजळीत काटे असूनहि
              फुले वेचण्यास गेलो
रस्ता निखाऱ्यांचा असला
              तरी शांत चालीत राहिलो
पुढे चालतांना आल्या मागील आठवणी
             परि त्यांना विसरित गेलो
अनेक खेद खंत असले
              तरी आपलेसे करित गेलो
जरी मिळाले नसले काही
              तरी कर्तव्य करीत राहिलो
कंगालपणाचे हसू , दारिद्रयाचे लेणे
               कपाळी लावत आलो
हाती कटोरा असला
               तरी दान देण्यास गेलो
नव्हते एवढे अवसान
                तरी आभाळ पेलण्यास गेलो 

मी सुखी आहे

आसवात भिजलेल्या निरांजनीच्या प्रकाशात मी सुखी आहे
तुम्ही दिलेल्या शापातूनही मी सुखी आहे

कधीतरी देऊ केलेले दान झेलतांना
वाटेत पेटवत आलेल्या पेलेत्यांना
वाटतो आनंद सांगतांना - की मी सुखी आहे

चंद्रमौळीच्या घरट्यातून चंद्राला पाहतांना
आभाळाची आसवे ओंजळीतून पितांना
आसमंताला सांगतो मी गातांना - की  मी सुखी आहे

दूरचे दिवेही आहेत विझलेले
जवळच्या सावल्याही आहेत लपलेले
आवाजाचे प्रतिशब्दही आहेत विरलेले
मी असाच एकांती उभा आहे ........

डोळ्यात अशीच काजळी राहू दे
चिमणीला अशीच उघड्यावर वावरू दे
अभयारण्यातल्या वाऱ्याला सभोवती घोंगावू दे
प्रलयही आता सोबतीला आहे 

सांगू कसे कुणा मी !

सांगू  कसे कुणा मी , माझेच घात होते 
त्यासाठी नाही कुणाचे , आपल्यांचेच हात होते

होती कृतज्ञतेची , मुखी खूप मोठी भाषा
होती नयनी माझ्या , खूप मोठी आशा
जोडीले जे होते ते कृतज्ञतेचेच हात होते

काळजात माझ्या तुमचेच रक्त होते
उरी भावनेचे खूप बंधने जपून होते
आता तुम्हीच याला तुडवून जात होते

रडले किती तरीही , हे अश्रू मुके होते
वेदनांचे हुंकारही , आत खोल होते
माझ्याच सावल्यांनी , मज अंतरले होते 

पाश

मन तुझे भावनेचे
सूर माझे भावनेचे
पण जगी आहेत , खेळ क्रूरतेचे

नाही वंचना , नाही कुचंबणा
असेच असावे स्वप्नी जीवनीं
नको  त्या आठवणी दूर्दम्यतेचे

ही आसवे उगीच नको गाळुस
नको माणसातल्या माणुसकीला जागवूस
आहेत झालेली येथे प्रेते मानवतेचे

विसरुनी जा आता त्या रम्य आठवणी
होती हिरवळ चहू भोवती तुझ्या जीवनी
नवीन चित्र तयार कर जिवंततेचे

तू सुध्दा रुसलीस वाटते माझ्या कवितांना
तुला मी दिसायला हवास फक्त पैशात खेळतांना
आता पाश उरले आहेत मला फक्त कवितेचे 

स्पर्श तुझा पहिला

झनझनली, शिरशिरली रुह्दयात मुरली कपोल हसले अधर खुलले मनात बसले चित्त तुझे ठसले स्पर्शासह खुलले नंदनवन मनात फुलले हास्याच्या लहरी मधुन...